शिक्षणभरारी मध्ये आपले स्वागत आहे

स्मार्ट किडस

                                                                     आईचा दिवस

               मदर्स डेसाठी अदिती आणि आखिलेषची जोरदार तयारी चालू झाली होती. रोजच्या दोघांच्या चर्चा, कागदावर सारखे गुपचूप लिहीणे आजोबा दोनचार दिवसांपासून पाहात होते. आज त्यांनी त्याबद्दल मुलांना विचाराचे ठरवलेच. "काय गं आदिती, काय गडबड चालली आहे? दोन चार दिवसांपासून तुम्ही दोघेही काहीतरी कामात आहात?". आजोबांनी हा प्रश्न विचारल्यावर आदितीने घाबरुन खोलीत आई नाही ना ह्याची खात्री करुन घेतली. "अहो आजोबा, मदर्स डे आहे नां त्याची तयारी करतो आहोत." आखिलेषने दबक्या आवाजात सांगितले. "मदर्स डे म्हणजे आपला मातृदिन होय" आजोबा समजूतीने म्हणाले. "मातृदिन नाही हो आजोबा, 'मदर्स डे'!
आम्ही त्याच्या सेलिब्रेशनची तयारी करत आहोत." आदितीने समजूत काढली. आखिलेष पुढे समजावत म्हणाला," आजोबा मी इंटरनेटवर वाचले आहे मदर्स डेची सुरुवात प्रथम ग्रीक आणि रोमन लोकांनी ख्रिस्त जन्मपूर्व २५० वर्षांपूर्वी केली. निसर्गमातेचा उत्सव म्हणून सुरु केला गेलेला हा दिवस आपआपल्या मातांना प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. आता भारतीयही मातृदिना बरोबरच मदर्स डेही साजरा करतात. आम्हीही आईसाठी हा दिवस स्पेशल करणार आहोत." आजोबांनाही ही माहिती नवीनच होती. पाश्चात्यांची प्रथा असली तरी आईसाठी मुले काम करता आहेत हे पाहून आजोबांना खूप आनंद झाला होता. ते उत्साहाने म्हणाले, "मुलांनो, मलाही तुमचा प्लॅन सांगा. मी सुध्दा तुम्हाला काहीतरी मदत करु शकेन". आजोबांचे आश्वासन ऐकून मुलांनाही उत्साह आला.
आदिती सांगू लागली," रविवारी आम्ही दोघेही आईच्या आधी उठून तिला सकाळचा चहा करुन देणार आहोत. त्यानंतर दुपारचे जेवणही आम्हीच करणार आहोत. बाबा आम्हाला पोळ्या करायला मदत करणार आहे." आखिलेष पुढे म्हणाला," आईसाठी आम्ही खास शुभेच्छापत्रही तयार केले आहे. साठवलेल्या पैश्यातून तिच्यासाठी छोटेसे गिफ्ट आणि आवडीचे मोगर्‍याचे गजरेही आणणार आहोत." मुलांचे प्लॅन ऐकून आजोबा खूष झाले, "मुलांनो तुमचा मदर्स डे नक्कीच स्पेशल होणार आहे. मीही त्या दिवशी तुम्हाला कामात मदत करीन''. स्मार्ट कीड्स तुम्ही मदर्स डेच्या तयारीला लागला आहात ना?
                                                                                                                                       भाग्यश्री केंगे
                        
                                                                     मैत्रीचे मोल

                भुवनचे आईबाबा बंगलोर सारखे मोठे शहर सोडून चिकमगलूर सारख्या छोट्या गावी राहायला आले. बर्‍याच दिवसांपासून त्यांना शहरातले प्रदुषण, आवाज, धूळ आणि वेगवान आयुष्यापासून दूर शांततेत जगायचे होते. त्यांनी विचार केला आठ वर्षाच्या भुवनला ह्या छोटया गावात जुळवून घेणे सहज शक्य होईल. परंतु भुवनला मात्र त्याच्या नवीन शाळेचे मित्र अजिबात आवडले नव्हते. बंगलोरच्या शाळेचे मित्र अत्यंत स्मार्ट होते. नवीन गावातल्या शाळेचे मित्र मात्र त्याला इतके स्मार्ट वाटत नसत. ही मुले इंग्रजीत न बोलता सतत आपल्या मातृभाषेत म्हणजेच कन्नडात बोलत आणि डब्यात दहीभात आणत असत. भुवन त्या मुलांपासून अलिप्त राहात असे त्यामुळे वर्गातली मुले त्याच्याशी बोलायला उत्सुक नसत. भुवनला त्यांच्या सारखे झाडावर चढणे, मोठयांची सायकल चालवणे व गावाकडचे खेळ खेळणे अजिबात जमत नसे. वर्गातही अभ्यास करतांना भुवन सतत शिक्षकांच्या पुढे पुढे करायचा त्यामुळे वर्गातली इतर मुले त्याला आपल्यापेक्षा हुशार आणि वेगळी समजत असत. अश्यामुळे शाळेत येऊन इतके दिवस झाले तरी त्याला कुणीच मित्र मिळाले नव्हते. भुवन अगदी एकटा पडला होता.
एके दिवशी तो असाच उदास बसला होता. "माझ्याशी कोणी मैत्री का करत नाही?", "मला कुणीच खेळायलाही बोलवत नाही", "ह्या गावात येऊन मी अगदी एकटा पडलो आहे" असे म्हणतांना भुवनला अगदी रडू येत होते. असे म्हणत असतांनाच त्याच्या टेबलवर एक पिवळा-नारिंगी प्रकाश भुवनला दिसला. त्या पाठोपाठ डोक्यावर सोनेरी मुकूट घातलेली दीड फूट उंचीची छोटी परी अवतरली. भुवन रडणे थांबवून तिच्याकडे पाहू लागला. परी म्हणाली," भुवनबाळा तुझे दुःख मी जाणते. सगळी मुले तुझ्याशी खेळायला लागतील. मैत्री करतील. मात्र त्यासाठी तुला बरेच बदलावे लागेल. आहेस तयार ह्या सार्‍यांसाठी". भुवने आनंदाने आपली मान हलवली. तिने तथास्तु म्हटले.
दुसर्‍या दिवशी शाळेत चित्रकलेची स्पर्धा होती. भुवनची चित्रकला उत्तमच होती. स्पर्धेसाठी खास त्याच्या बाबांनी त्याला नवीन रंगपेटी बक्षीस दिली होती. पण आज भुवने वेगळाच निश्चय केला होता. शाळेत गेल्याबरोबर त्याने चित्रकलेच्या वृंदा मॅडमला सांगितले की बर वाटत नसल्यामुळे त्याला स्पर्धेत भाग घ्यायचा नाहीये. त्याने आपली नवीन रंगपेटीही वर्गातल्या मुलांना वापरायला दिली. वर्गातल्या मुलांना खूपच आश्चर्य वाटले.
मधल्या सुट्टीत भुवन वेगळा न बसता स्वतःहून मुलांच्या गोलात सामील झाला. आईने स्पर्धेच्या दिवसासाठी खास म्हणून डब्यात दिलेला पाईनऍपल केक सगळ्या मुलांना वाटला. सगळ्या मुलांनी मिटक्या मारत आणि भुवनच्या आईचे कौतूक करत केक संपवला. केक संपल्याचे भुवनला अजिबात वाईट वाटत नव्हते. उलट बदल म्हणून त्याने कविताने आणलेला दहीभात खाल्ला. इतक्यात आदित्य आणि ऋषी तेथे आले आणि म्हणाले,"भुवन तुझे टॅटू तू आमच्या कंपासमध्ये टाकलेस का?, आम्हाला कितीतरी दिवसांपासून ते हवे होते. धन्यवाद भुवन." भुवनेही मान डोलावली पण त्याला माहीत होते की हे सारे छोटया परीने केले आहे. त्याने तिला मनोमन धन्यवाद दिले.
नंतर खेळाच्या तासाला राघव भुवनला मोठी सायकल चालविण्याचा आग्रह करत होता. "तुला वाटत मला हे जमेल?", भुवनने भीतभीत त्याला विचारले. "हो का नाही. मी आहे ना तुला शिकवायला", राघव आश्वासक आवाजात म्हणाला. भुवनने चक्क मोठी सायकल चालवून बघितली. थोडयाच वेळात भुवन सार्‍या मुलांबरोबर खेळत होता, मस्ती करत होता, हसत खिदळत होता. चिकमगलूरला आल्यापासून आजचा त्याचा दिवस खूपच आनंदात गेला होता. एका दिवसात अचानक त्याला खूप मित्रमैत्रिणी मिळाल्या होत्या.
रात्री घरी जाऊन त्याने परीला बोलावले पण ती काही आली नाही. झोपल्यावर मात्र परी त्याच्या स्वप्नात आली. भुवनला म्हणाली,"भुवन आज तुला मी मुलांशी मैत्री करायला मदत केली. आता तू स्वतःहून मित्र जोडले पाहिजेस. तू गुणी मुलगा आहेसच परंतु सर्व मित्रांना मदत करायला आणि त्यांच्या बरोबर जुळवून घ्यायला तुला शिकलेच पाहीजे. त्यामुळेच तू सर्वात 'बेस्ट' होशील". भुवन परीचे म्हणणे ऐकून स्वप्नातच मान डोलवत होता.
मूळ कथा - अरुणा गोपाकुमार
भावानुवाद - भाग्यश्री केंगे

                                                           
                                                                      व्यायामाचे महत्त्व

                    विनित आणि अनिकेतची दाट मैत्री होती. त्यांच्या तिसरीच्या वर्गाची ट्रीप डोंगरावर जाणार आहे असे प्राची टिचरांनी सांगताच सर्व मुले आनंदाने 'हुर्रे' ओरडली. होता होता तो दिवस उजाडला आणि सारी मुले सकाळी ठीक सात वाजता शाळेत हजर झाली. बस लगेचच सुटल्यामुळे सगळी मुलं खूपच एक्साईट झाली होती. सगळ्यांनी खाऊची अगदी जय्यत तयारी करुन आणली होती. साडे आठला गाडीतच सगळयांनी ब्रेकफास्ट करायचा ठरला. सर्वांनी आपआपले डबे उघडले. विनितनेही डब्यात आणलेला शिरा आणि ऍपलचा चट्टामट्टा करायला सुरूवात केली. अनिकेत मात्र कोल्डड्रिंक्स आणि भलमोठं वेफर्सच पाकीट खात होता. होता होता बस डोंगराच्या पायथ्याशी पोहोचली.
सगळी मुले खाली उतरल्यावर टिचरांनी सांगितले ''मुलांनो उंचावरची लेणी पाहण्यासाठी आपल्याला डोगंर चढायचा आहे." मुलं तर काय तयारच होतीच. सर्वांनी आपल्या बॅगपॅक पाठीवर टाकल्या, टोप्या घातल्या आणि चढायला सुरूवात केली. मधून मधून उत्साह वाढावा म्हणून टिचर त्यांना '' हर हर महादेव'' म्हणायला सांगत होत्या. मुलांनाही आरोळया देतांना अगदी शिवाजीचे मावळे झाल्यासारखे वाटत होते.
जसे जसे हे मावळे वर जात होते तसा त्यांचा उत्साह कमी कमी होत होता. त्यांना दम लागत होता. बरेच जण थांबत थांबत चढत होते तर काहीजण सारखे पाणी पीत होते. डोंगर चढायचा उत्साह फारच थोडया मुलांमध्ये शिल्लक होता अपवाद फक्त विनितचा! तो सर्वात आधी डोंगरावर जाऊन पोहोचला. विनितच्या मागोमाग सगळे पोहोचल्यावर सार्‍यांनी फिरुन डोंगर आणि लेणी पाहिली.
संध्याकाळ होत आल्यामुळे खाली उतरणे आवश्यक होते. प्राची टिचरांनी सगळयांना जवळ बोलावले आणि त्या मुलांना समजावत म्हणाल्या, ''आज बहुतेक मुलांना डोंगर चढतांना दम लागला. अनिकेत तर सर्वात मागे राहिला होता. तुमच्यात न दमता जर कोणी डोंगर चढला असेल जर तो आहे विनित. असं का माहिती आहे का? " मुलांनी नाहीच्या माना डोलावल्या.
टिचरांनी कारण समजावत सांगितले, "विनित अजिबात जंकफुड खात नाही. आईने केलेले पदार्थ कुरकूर न करता मनापासून जेवतो. त्यामुळे त्याच्या शरीराचे चांगले पोषण होऊन शक्ती वाढते. दररोज सकाळी व्यायाम केल्यामुळे त्याचा स्टॅमीना पण वाढला आहे. तुम्ही जर त्याच्या सारखे वागलात तर तुमचाही स्टॅमीना वाढून न दमता तुम्हीही डोंगर चढू शकाल". "कधीतरी बदल म्हणून वेफर्स, बिस्किटे खायला हरकत नाही. पण संपूर्ण जेवण त्यावर नको. काय समजले ना? "मुलांनी मोठयाने हो म्हटले आणि उडया मारत डोंगर उतरायला सुरूवात केली.

No comments:

Post a Comment